गेल्या 24 तासापासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेत-शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी लाखो रुपयांचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
काल गुरुवारी सायंकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर परिसर व नजीकच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिकासह रब्बी पिकातही पाणी शिरल्याने सर्व पिक मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पाऊस जर असाच पडत राहिला तर आगामी खरीप हंगाम लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर गडगंज मालमत्ता करून असणाऱ्या आमदारांचे मानधन 2 लाखापर्यंत वाढविणाऱ्या सरकारने त्याऐवजी नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत करावी, अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांमधून व्यक्त होत आहे.
शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील शेतात कोथिंबीर, कोबी, फ्लावर, बीट, भेंडी, ढबु मिरची, मिरची, मेथी आणि लालभाजी या भाजीपाल्याची पिके घेण्यात आली आहेत. गेल्या कांही दिवसांसह काल सायंकाळ आणि रात्रभरापासून पडत असलेल्या पावसामुळे या पिकांच्या गाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता ती कुजून वाया जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर होणारच आहे, तसेच यानंतर खरीप हंगामात होणारी भाताची पेरणी देखील लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जुने बेळगाव येथे हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते रस्त्यावरून वाहत आहे. त्याचप्रमाणे येळ्ळूर रोडच्या ठिकाणी बायपासच्या कामासाठी तैनात ट्रक, जेसीबी आदी अवजड वाहने पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी निर्माण होऊन आतल्या बाजूला अडकून पडली आहेत. एकंदर पावसाळी परिस्थितीमुळे हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाचे सध्यातरी तीन तेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.