राज्यातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरती प्रक्रियेमधील गैरव्यवहारामध्ये अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सरकारने सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
गोकाक येथे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार जारकीहोळी यांनी पीएसआय भरती गैरव्यवहारांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांवरच या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपविणे कितपत योग्य आहे? असा सवाल केला.
एकाच परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा दिलेले अनेक परीक्षार्थी पीएसआय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यामध्येही काळंबेर असल्याचे दिसून येत आहे. तेंव्हा या प्रकरणाचा प्रामाणिक व सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या 7 व 8 मे रोजीच्या बेळगाव जिल्हा दौऱ्याबाबत विचारणा केली असता आमदार सतीश जारकीहोळी यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे येत्या 7 मे रोजी बेळगावला येणार आहेत.
या दिवशी दुपारी 3 वाजता ते बेळगाव शहर काँग्रेस भवन येथे बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, चिक्कोडी, विजयपूर आणि बागलकोट या जिल्ह्यातील नेतेमंडळींची सभा घेऊन विधान परिषदेच्या नैऋत्य पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत, अशी माहिती दिली.