येत्या बुधवारी अमृत महोत्सवी सोहळा साजरा करणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने यंदाच्या अहवाल झाली 31 मार्च 2022 अखेर 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला असून समाधानकारक कर्ज वसुलीसह 116 कोटी 18 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
बँकेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चेअरमन दिगंबर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा को-ऑप बँकेचे 31 मार्च 2022 अखेर 9,307 सभासद असून भागभांडवल 2 कोटी 70 लाख रुपये आहे. बँकेचा राखीव निधी 62 कोटी 50 लाख रुपये असून ठेवी 161 कोटी 11 लाख रुपयांचे आहेत अन्य बँका व सरकारी रोख्यातून बँकेने 82 कोटी 65 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बँकेने 116 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून कर्ज वसुली समाधान कारक आहे. यंदाच्या अहवाल साली मराठा बँकेने 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. बँकेचे खेळते भांडवल 235 कोटी 99 लाख रुपये इतके आहे. अनेक वर्षापासून बँक आपल्या सभासदांना 15 टक्के डिव्हीडंट देत आहे. सोने तारण कर्ज देण्यात आमची बँक जिल्ह्यात प्रथम आहे. सरकारी ऑडिटमध्ये मराठा बँकेला आजवर ‘अ’ वर्ग मिळालेला आहे, अशी माहिती चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
आजच्या स्पर्धात्मक युगातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन बँकेने त्याचा अंतर्भाव आपल्या कार्यप्रणालीत केला आहे. त्यामध्ये एटीएम, एसएमएस, इंटरनेट बँकिंग, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत इमिडियट पेमेंट सिस्टीम या सुविधांचा समावेश आहे. कोअर बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकांना मराठा बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येत आहे. विश्वासाहर्ता आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे मराठा बँकेला यापूर्वी उत्कृष्ट सहकारी बँक, बेस्ट स्वनिधी असलेली बँक आदी पुरस्कार मिळाले आहेत असे सांगून मराठा बँक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून देखील अग्रेसर आहे, असे पवार यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून मराठा बँकेतर्फे दरवर्षी दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होणाऱ्या सभासदांच्या गुणी मुलांचा रोख रक्कम व मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो. गरीब शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. वयाची 60 वर्षे आणि सभासदत्वाची 25 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन वेतन म्हणून 1000 रुपये दिले जातात. मराठी भाषा संवर्धनासाठी भरविल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनांना आणि वाचनालयांना दरवर्षी बँकेकडून आर्थिक मदत दिली जाते.
कोरोना काळात मराठा मंदिर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला मराठा बँकेने आर्थिक सहाय्य केले आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात बँकेच्या सभासदांना कोरोना प्रतिबंधक लसही उपलब्ध करून दिली आहे. पोहण्याच्या स्पर्धा आणि शरीरसौष्ठव स्पर्धा यांना दरवर्षी बँकेकडून आर्थिक मदत केली जाते. याव्यतिरिक्त अन्य सामाजिक उपक्रमांना बँकेकडून सहकार्य लाभत असते, असे चेअरमन दिगंबर पवार यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस मराठा बँकेच्या व्हा. चेअरमन निना सुहास काकतकर, संचालक बाळाराम पाटील, दिपक दळवी, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, सुनील अष्टेकर, बाबुराव पाटील, विश्वनाथ उर्फ शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, सुशीलकुमार खोकाटे, रेणू किल्लेकर व लक्ष्मण नाईक यांच्यासह बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते.