जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्नासंदर्भात बोलताना म्हटले की, सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात असताना बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी चुकीची आहे. त्यांच्या या विधानानंतर बेळगावमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी सबनीस यांच्या मताशी आपण सहमत असून मुख्य मागणीऐवजी मुद्दा भरकटला जाऊ नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे ते म्हणाले. सीमाप्रश्नासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा किंवा केंद्रशासित करावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने एकाच मुद्द्यावर ठाम राहण्यास सुचविले. सीमाप्रश्नासंदर्भात लढ्याच्या सुरुवातीपासून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचीच मागणी करण्यात येत होती. हाच एकमेव मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीपासून मांडण्यात येत असून केंद्रशासित करण्याची मागणी करून मूळ प्रश्न बाजूला सारण्यात येऊ नये असे प्रकाश मरगाळे म्हणाले.
सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणीही अत्यंत चुकीची असून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीवर भर देणे महत्त्वाचे असल्याचे प्रकाश मरगाळे म्हणाले. सीमाभाग केंद्रशासित करून पुन्हा पन्नास वर्षे याच प्रश्नासाठी न्यायालयात लढा देण्याची मानसिकता सीमावासियांची नाही. त्यामुळे लवकरात लवकर सीमाप्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, सीमाप्रश्नी दिशाभूल करणारी मागणी कोणीही करू नये असे, आवाहन देखील प्रकाश मरगाळे यांनी केले.
श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यासंदर्भात बेळगाव मधील काही प्रसारमाध्यमांनी माफी मागावी अशी मागणी केली असून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रकाश मरगळे म्हणाले, सीमाप्रश्नाची सोडवणूक या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून माफी मागण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.