पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधनाच्या दरात मोठी कपात झाली असून त्यामुळे बेळगावात कालपासून पेट्रोल 101.71 रुपये तर डिझेल 87.71 रुपये झाले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना दिलासा मिळाला असला तरी पेट्रोलपंप मालकांना मात्र मोठा फटका बसला आहे.
पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने इंधनाच्या दरात मोठी कपात झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात दोन वेळा इंधनाच्या दरात मोठी कपात केल्याने 5000 लिटर इंधनाची क्षमता असलेल्या पेट्रोल पंप मालकांना सरासरी 10 लाखांचा फटका सहन करावा लागला आहे. कोरोना नंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती.
गेल्या दिवाळीपर्यंत तर पेट्रोल 115 रुपये प्रति लिटर झाले होते तसेच डिझेलनेही शंभरी पार केली होती. त्यानंतर केंद्राने व राज्याने एकदाच कर कमी केल्यामुळे पुन्हा पेट्रोल शंभरच्या घरात व डिझेल ऐंशीच्या घरात गेले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यापूर्वी सतत पंधरा दिवस पेट्रोल व डिझेलची वाढ करण्यात आल्यामुळे पेट्रोल 110.86 तर डिझेल 94.61 रुपयांवर स्थिर होते. आता पुन्हा उत्पादन शुल्क कमी केल्याने या दरात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
अलीकडे दोन वेळा इंधन दरात कपात केल्याने पेट्रोल पंप मालकांना मात्र नुकसान सहन करावे लागत आहे. याव्यतिरिक्त पूर्वी ऑइल कंपनीकडून पाच दिवसांच्या क्रेडिटवर इंधन देण्याची जी सवलत दिली होती ती गेल्या एप्रिलपासून बंद झाल्यामुळे संपूर्ण पैसे भरूनच इंधन खरेदी करावे लागत आहे. याचा फटकाही प्रत्येक वितरकाला बसत आहे.
कोरोनामुळे अडचणीत आलेले पेट्रोल पंप मालक आता पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान कर्नाटका पेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दर अधिक आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातसह परिसरातील वाहन चालक कर्नाटकात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणे पसंत करीत आहेत.