घरोघरी सर्व प्रकारची वृत्तपत्र आणि दुधाचे वाटप -विक्री मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कोरे गल्ली शहापूर येथील रमेश सरवडे यांची गरज लक्षात घेऊन त्यांना जुना गुड्स शेड रोड येथील वन टच फाउंडेशनतर्फे सुमारे एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.
वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी स्वतः सरवडे यांच्या घरी जाऊन जीवनावश्यक साहित्य दिले आणि रमेश सरवडे यांची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सरवडे यांची पत्नी अर्धांगवायूनी अंथरुणावर खिळून आहे.
त्यांची आई वरचेवर आजारी पडत असते, एक कर्ता तरुण मुलगा आहे त्याला घश्याच्या त्रास असून याच्या उपचाराचा खर्च महिना 6 हजार रुपये, तर पत्नीचा वैद्यकीय खर्च महिना 2 हजार रुपये येतो. घर भाडे 2 हजार आहे.
हे सर्व पाहून ऐकून विठ्ठल पाटील यांनी आपल्या वन टच फाऊंडेशन संस्थेच्या पुढाकाराने दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून रमेश सरवडे यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी ज्या दानशूर व्यक्तिंना ‘आपण जन्माला येऊन आपणही या समाजाचे काही तरी देणे लागतो’ याची जाणीव आहे त्यांनी जीवनावश्यक आहार धान्य -साहित्य, किंवा आर्थिक स्वरूपात रमेश सरवडे यांना मदत करावी आणि यासाठी वन टच फाऊंडेशनशी (8884640133) संपर्क साधावा, असे आवाहन विठ्ठल फोंडू पाटील यांनी केले आहे.