शहराच्या मुख्य बाजारपेठेतील जवळपास 30 तळघरमालकांना महापालिकेने नोटीस बजावली असून तळघरातील आस्थापने हटवून तळघरे पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा आदेश बजावला आहे. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरांमधील आस्थापनांच्या विरोधात महापालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली आहे. किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली व खडेबाजार येथील तळघरमालकांना महापालिकेने तळघरातील अस्थापनं हटवून तेथे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश नोटिशीद्वारे बजावला आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरमालकांना नोटीस दिली जाईल. त्यानंतर संपूर्ण शहरातील तळघरमालकांना नोटिशी दिल्या जातील, अशी माहिती मिळाली आहे.
शहरातील तळघरातील आस्थापनांची जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक नितेश पाटील आग्रही आहेत. त्यांनी त्याबाबतची सूचना महापालिका आयुक्त डॉ रुद्रेश घाळी यांना दिली आहे. यापूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील खडेबाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली येथील तळेघरांवर कारवाई सुरू झाली होती. या कारवाईला तळघरमालकांनी जोरदार विरोध केल्यामुळे ही मोहीम थांबवावी लागली होती.
त्यानंतर पुन्हा तळघरांचा विषय चर्चेला आला नव्हता. आता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शहरात फेरफटका मारून शहरातील पार्किंग समस्येला तळघरे जबाबदार असल्याची माहिती घेतली आहे. त्यामुळे तळघरातील आस्थापने हटविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र त्यांनी हाती घेतलेली ही मोहीम पूर्ण होणार का? हे पहावे लागणार आहे.