बेळगाव जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उद्या बेळगावमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
वायव्य शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी आणि पदवीधर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सुनील संक हे उभयता उद्या बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कर्नाटक राज्य काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदी प्रमुख काँग्रेस नेते मंडळींसह आजी -माजी आमदार आणि अन्य काँग्रेस नेते मंडळी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
रेल्वे ओव्हरब्रिज खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता प्रथम काँग्रेस पक्षाचा नामांकन समारंभ होणार असून हा समारंभ झाल्यानंतर प्रकाश हुक्केरी आणि सुनील संक हे दोघेही दुपारी 2 ते 3 या कालावधीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.