कर्नाटक राज्य वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुनील संख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी आज बुधवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी व सुनील संख यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांना पक्षाने वायव्य शिक्षक मतदारसंघातून तर सुनील संख यांना पदवीधर मतदारसंघातून उभे केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी अध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री एम. बी. पाटील आदी उपस्थित होते.
वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघामध्ये बेळगाव जिल्हा, बागलकोट जिल्हा आणि विजापूर जिल्हा यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यांमधील नोंदणीकृत पदवीधर आणि नोंदणीकृत शिक्षकांना या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचा हक्क आहे. दरम्यान आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मराठा मंदिर येथे काँग्रेसची नामांकन सभा पार पडली.
‘हुक्केरी यांच्या उमेदवारी बाबत डी के शी काय म्हणाले’
विधान परिषद निवडणुकीत आम्ही पदवीधर आणि शिक्षकांना लॅपटॉप देत आहोत या आरोपाचे खंडन करताना के पी सी सी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आम्ही लॅपटॉप वगैरे काही देत नसून दोन्ही हात जोडून मतदारांना विनंती करून मत मागत आहोत असं स्पष्टीकरण दिलं.
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रकाश हुक्केरी आणि पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सुनील संख या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिक्षक आणि पदवी दारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकाश हुक्केरी यांच्या सारखे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी आम्ही वरिष्ठ अशा प्रकाश हुक्केरी यांची शिक्षक मतदार संघासाठी तर संख या सारख्या युवकाची पदवीधर मतदारसंघासाठी निवड केली आहे.
प्रकाश हुक्केरी शिक्षक नाहीत असा अपप्रचार भाजपाकडून केला जात आहे त्यावर तुमचे मत काय आहे यावर बोलताना डी के शिवकुमार यांनी तालुका पंचायत सदस्य जिल्हा पंचायत सदस्य आमदार विधानसभा विधानपरिषद खासदार या सगळी पदावर काम केलेले अनुभवी असलेले प्रकाश हुक्केरी हे काँग्रेसचे लीडर आहेत. सगळ्याचा अभ्यास करून आम्ही प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी दिली आहे असे स्पष्टीकरण दिलं