विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची अधिसूचना काल गुरुवारी जारी करण्यात आली असून अधिसूचनेबाबतचे पत्रक प्रादेशिक आयुक्त व निवडणूक अधिकारी आमलान आदित्य बिश्वास यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवडणूक अधिसूचना जारी झाल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा असली तरी काल पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालय येथे किंवा सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालयात 26 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) सादर करता येणार आहे.
निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध असणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 27 मे रोजी सकाळी 11 वाजता केले जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी अर्ज द्यावा लागेल. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येत्या 13 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी बिश्वास यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक घोषित करून वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये 19 मे रोजी अधिसूचना जारी होईल असा उल्लेख होता. त्यानुसार प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिश्वास यांनी अधिसूचना जारी केली आहे.