राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी येत्या 3 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत उभे असलेल्या सर्व 7 उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी केली आहे.
निवडणूक न होताच विधान परिषदेच्या 7 जागांसाठी उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 7 जागांसाठी येत्या 3 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती.
या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवार, काँग्रेसने दोन आणि निजदने एक उमेदवार उभा केला होता. या पद्धतीने एकूण सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होत. गेल्या 25 मे रोजी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत फक्त सातच अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर 25 मे रोजी अर्जांची छाननी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
निवडणुकीसाठी सातपेक्षा जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नसल्यामुळे संबंधित 7 जणांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी आज घोषित केले.
त्याचप्रमाणे निवडून आलेल्या विधान परिषदेच्या नूतन सदस्यांना सचिव विशालाक्षी यांनी प्रमाणपत्रं दिली. या नूतन विधान परिषद सदस्यांमध्ये भाजपचे लक्ष्मण सवदी, छलवादि नारायणस्वामी, केशव प्रसाद, हेमलता नायक, काँग्रेसचे अब्दुल जब्बार, नागराज यादव आणि निजदचे टी. ए. शरवण यांचा समावेश आहे.