राज्यात गेल्या तीन महिन्यापासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार अथवा पुनर्रचनेची सर्कस सुरू आहे. संक्रांत, शिवरात्री, गुढीपाडवा, बसव जयंती हे सर्व मुहूर्त टळून गेले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मात्र अद्यापपर्यंत लागलेला नाही. परिणामी मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची अवस्था ‘नाळे बा’ अशी झाली आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सुपुत्र विजयेंद्र, योगेश्वर, लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी आदी बरेच नेते मंडळी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी इच्छुक असल्याची राज्यभर चर्चा आहे. मात्र हे सर्वजण मंत्री होणार तरी केंव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात आठ -दहा वेळा दिल्ली दौरा करून आले आहेत. प्रत्येक वेळी भाजप हाय कमांडशी राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले असल्याचे सांगितले जाते.
त्याचप्रमाणे एकदा पंतप्रधान उपलब्ध नव्हते, आणखी एकदा नड्डा यांची भेट होऊ शकली नाही त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही, अशी कारणे दिली जातात. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार अथवा पुनर्रचना लांबणीवर पडत चालली असून त्यामुळे मंत्रिपदाची आशा बाळगून असलेल्यांची मात्र वारंवार निराशा होत आहे.
दरम्यान, राज्यात एमएलसी इलेक्शनची घोषणा करण्यात आली आहे ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे