भारतीय जनता पक्षामध्ये कोणतीही दुफळी नसून फक्त पक्षाला विजयी करण्यासाठीचे एकमत आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्पष्ट केले.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री जोशी बोलत होते. मी मतभिन्नता मिटवण्यासाठी आलेलो नाही. पक्षाची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबविली गेली पाहिजे यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मी येथे आलो आहे. त्या संदर्भात मी बैठकीत आवश्यक सूचना दिल्या असून सर्व कांही सुरळीत होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.
आमच्या सर्व आमदार आणि खासदारांशी मी चर्चा केली असून दोन्ही निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सर्व ती तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमची प्रमुख नेतेमंडळी येणार असून त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. प्रमुख नेतेमंडळींच्या प्रचार सभा येत्या 28 मेपर्यंत आटोपण्याचा विचार आहे. या सभा यशस्वी करण्याची तसेच आपल्या मतदारसंघात पक्षाला बहुमत मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित विधानसभा मतदार संघातील आमदारांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. भाजपला बळकट करण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून आज आमचा पक्ष देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.
विविध योजनांसाठी आम्ही कर्नाटकाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. देशामध्ये मोदी आणि आता कर्नाटकात बोम्मई, हा सर्व जनतेचा आशीर्वाद असून तो यापुढेही कायम राहणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील अन्य घडामोडींचा संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना केंद्रीय मंत्री जोशी यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेस जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, राज्य भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी, खासदार मंगला अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके, भालचंद्र जारकीहोळी आदी उपस्थित होते.
बैठकीला चार आमदारांची दांडी
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भाजपच्या 4 आमदारांनी गैरहजर राहून दांडी मारल्यामुळे भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बेळगाव जिल्हा भाजपमधील गटातटाच्या राजकारणाला पायबंद घालण्यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी बेळगाव येथील एका खाजगी हॉटेलमध्ये सर्व भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली.
सदर बैठकीस जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, ॲड. अनिल बेनके, आनंद मामणी, महादेवप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, महांतेश दोड्डगौडर, राज्य भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी आदी नेते उपस्थित होते.
मात्र रमेश जारकीहोळी, पी. राजीव आणि दुर्योधन एहोळे आदी 4 आमदारांनी बैठकीला चक्क दांडी मारली होती. आमदार रमेश जारकीहोळी यांच्या बैठकीतील गैरहजेरीमुळे जिल्हा भाजपमध्ये अद्यापही गटातटाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.