ज्या मराठी भाषेसाठी 9 जणांनी हौतात्म्य पत्करले, कन्नडसक्ती विरोधात लढा दिला, ती कन्नडसक्ती अजूनही दूर झालेली नाही त्यामुळे सक्ती दूर होईपर्यंत लढतच राहूया असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी केले
कर्नाटक सरकार गेल्या अठरा वर्षांपासून स्वत:च्याच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे 1 जून हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस या कार्यालयात सोमवारी (दि. 30) शहर समितीची बैठक अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या जागी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची निवड केली आहे. मंत्री पाटील यांना सीमाप्रश्नाबाबत आपुलकी आहे. जवळीक असलेले मंत्री आम्हाला लाभले असल्यामुळे येत्या काळात लढ्याला चालना मिळेल. शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही आमची जबाबदारी सोपवली आहे. आम्ही प्रश्नाशी प्रामाणिक राहून लढा यशस्वी करायचा आहेअसे दळवी म्हणाले.
मराठी भाषेसाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे त्यांचा स्वाभीमान आमच्यात अंगिकारणे आमचे कर्तव्य आहे. मराठी कागदपत्रांसाठी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. निकाल आपल्या बाजुला लागला तरी गेल्या 18 वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी 1 जून रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यावेळी आम्ही मोर्चा काढून आमची ताकद दाखवू, असा प्रशासनाला इशारा देण्यात येणार आहे.
प्रकाश मरगाळे म्हणाले, आजपर्यंत अनेकांनी चुका केल्या आहेत. पण, आता कुणाच्या चुका उगाळण्याची वेळ नाही. जो समितीशी प्रामाणिक आहे, त्यांनीच काम करावे. म. ए. समितीची 150 जणांची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल.
यावेळी मदन बामणे, महादेव पाटील, रणजित हावळाण्णाचे, मोतेस बारदेसकर, सागर पाटील, अमित देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक केले. बुधवारी (दि. 1) सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रामा शिंदोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, शिवानी पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी, विकास कलघटगी, आदी उपस्थित होते