बेळगाव शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व संचालकांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना येत्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण दिले.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा वर्धापन समारंभ येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी आठ वाजता साजरा केला जाणार आहे. कॉ. कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या नेतृत्वा खालील संचालकांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालय यामध्ये पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी सर्वप्रथम शहरातील शिवजयंती मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण देण्यात आले. पोलीस आयुक्तांनी निमंत्रणाचा स्वीकार करून समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
अमृत महोत्सवी समारंभाचे निमंत्रण देताना पोलीस आयुक्तांना माजी कृषिमंत्री शरद पवार यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था असल्याची कल्पना देण्यात आली.
तेंव्हा पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी पवार यांच्या बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम हाती येताच पोलिसांकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले याप्रसंगी दिगंबर पवार यांच्या समवेत मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, सुनील अष्टेकर, विकास कलघटगी आणि बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते.