कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेवर अन्याय करायला शिकवत नाही, त्यामुळे कर्नाटक सरकारनेही मराठी भाषिकांवर बळजबरीने पाप करू नये. सध्या सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्यावर केंद्रशासित हा तोडगा नाही. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारने न्यायालया बाहेर मराठी माणसांची घुसमट दूर करावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. 8) यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिरतर्फे आज तिसरे मराठी साहित्य संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानावरुन श्री सबनीस बोलत होते.
श्री सबनीस म्हणाले, मराठी आणि कन्नडचा परस्पर संबंध आहे. कन्नड मधील बसवेश्वर, पुरंदर, कनकदास ते गिरीश कर्नाड, चंद्रशेखर पाटील यांच्यापर्यंत कोणत्याही संत, लेखकाने मराठी विरोधात लिहिलेले नाही. खरे साहित्य माणसे तोडायला शिकवत नाही. मानवतेची पताका मिरवत राहते.
सीमाभागाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. आम्ही संवादावर भर देतो. त्यामुळे मराठी माणसांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या सरकारने करू नये. न्यायालयात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी चुकीची आहे. त्यामुळे तिरंग्याला साक्षी ठेऊन महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारने हा वाद न्यायालया बाहेर मिठवावा, असे ते म्हणाले.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे तो न्यायालया सोडवेल पण कर्नाटक सरकारने मानवतेच्या भावनेतून मराठी जनतेकडे बघितले पाहिजे असेही त्यांनी नमूद केलं
उद्योजक अप्पासाहेब गुरव यांनी संमेलनाचे उदघाटन केले. यावेळी साहित्यिक शरद गोरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वकील सुधीर चव्हाण,उद्योजक महादेव चौगुले, मराठा बँकेचे दिगंबर पवार,शहर देवस्थान पंच रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद गोरे यांनी प्रत्येक जण वैश्विक व्हायला हवं जगातील सगळ्या भाषा याव्यात. सगळ्यांचा वैश्विक हा धर्म असला पाहिजे आजच्या घडीला धर्मासाठी राजकीय कार्यक्रम होत असल्याची टीका केली.
पोलीस बंदोबस्त अधिक: बेळगावात होणाऱ्या इतर साहित्य संमेलना पेक्षा या साहित्य संमेलनाला पोलीस बंदोबस्त अधिक होता मराठा मंदिराच्या गेट वर पोलीस जीप थांबून होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले हे या मुलांना विशेष अतिथी म्हणून येणार होते मात्र काही कारणास्तव ते आले नाहीत.