कुडची (ता. रायबाग) येथील गजानन शंकर बाले या युवकाने पुन्हा एकदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नांव यादीत ठळकपणे नोंदविले आहे.
गजानन बाले याला 2019 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण होऊन भारतीय पोस्टल खात्यात संधी मिळाली आहे. सध्या तेथे कार्यरत असतानाही सहाव्या म्हणजे शेवटच्या संधीत त्यांनी देशात 319 वा क्रमांक मिळविला आहे.
गजानन बाले यांची 2019 च्या परीक्षेत 683 क्रमांकाने निवड झाली होती. त्यावेळी त्याला भारतीय पोस्ट खात्यात संधी मिळाली. गाझियाबाद येथे त्याची भारतीय पोस्ट खात्यात सेवा सुरू आहे. त्या सेवेतील अधिकारपद असतानाही अभ्यास सुरूच ठेवून यूपीएससी परीक्षा देण्याच्या आपल्या सहाव्या आणि शेवटच्या संधीचे सोने करताना त्याने देशात 319 वे स्थान मिळविले आहे.इ
गजानन बाले हा कुडची येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांचे वडील शंकर हे उगार साखर कारखान्यात नोकरीला असून आई गृहिणी आहे. भाऊ अभियंता आहे. गजानन याचे सातवीपर्यंतचे शिक्षण रायबाग येथे झाले.
माध्यमिक शिक्षण उगार येथील श्रीहरी विद्यालयातून तर बारावीपर्यंतचे शिक्षण जीएसएस कॉलेज धारवाड येथे पूर्ण केल्यानंतर त्याने बेळगावच्या गोगटे कॉलेजमधून बीई (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी संपादन केली.
गजानन बाले याने पहिल्यांदा 2019 च्या म्हणजे त्यांच्या पाचव्या परीक्षेत आणि आता सहाव्या परीक्षेत असे यूपीएससी परीक्षेत दोनदा यश मिळविले आहे. सदर यशाबद्दल गजानन बाले याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.