कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अंतर्गत वाद सुरू होता. या वादाला कंटाळून मानसिक स्थिती बिघडल्याने कल्लाप्पा देसाई यांनी घरातील पहिल्या खोलीमध्ये गळफास लावून आपले जीवन संपविले.
कडोली गावामध्ये कलाप्पा देसाई हे कल्लण्णा म्हणून सुपरिचित होते. त्यांची स्वतःची शेत जमीन कमी असली तरी ते इतरांची आणि शेजारील गावातील अशी सुमारे 50 एकर शेतजमीन भाड्याने घेऊन कसत होते. कडोली परिसरातील आसपासच्या 10 गावांमध्ये त्यांचा चांगला नावलौकिक होता.
कल्लाप्पा देसाई यांच्या मृत्यूमुळे देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावामध्येही हळहळ व्यक्त होत आहे. उपरोक्त घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.