पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी हेस्कॉमने हाती घेतलेली ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची मोहीम अंतिम टप्प्यात आली असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 25 ते 500 केव्हीएपर्यंतच्या हजारो ट्रान्सफॉर्मरची तपासणी व दुरुस्ती करण्यात आली आहे.
गेल्या कांही दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या वादळी पावसामुळे हेस्कॉम तसेच अन्य विविध वीज वितरण कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. वादळी पावसामुळे वीज खांब कोसळणे पर्यायाने विजेच्या तारा तुटूण पडण्यासह अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर देखील निकामी झाल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार राज्यभरात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली होती.
सदर मोहिमेअंतर्गत ट्रान्स्फॉर्मरमधील ओईल योग्य आहे की नाही? इंसुलेटर ठीक आहे की नाही? यासह लूज कनेक्शनमुळे शॉर्टसर्किट होणार नाही आदी गोष्टींची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता एम. टी. अप्पणावर यांनी दिली.
दरम्यान, गेल्या 20 मेपर्यंत बेळगाव जिल्ह्यात 8823 -25 केव्हीए ट्रान्सफॉर्मर्स, 4783 -63 केव्हीए ट्रान्सफॉर्मर्स, 4156 -100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर्स, 512 -250 केव्हीए ट्रान्सफॉर्मर्स आणि 3 -500 केव्हीए ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे.