विविध कारणास्तव बेळगावकडून गोव्याकडे जाणाऱ्या तीन प्रमुख महामार्गांवर ये -जा करणाऱ्या ट्रक, टँकर, लाॅरी आदी वाहनचालकांना सध्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण संबंधित तिन्ही मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्यामुळे गोवा सरकारने चोर्ला घाटात अवजड वाहतुकीला मज्जाव केला आहे.
त्याप्रमाणे कर्नाटक सरकारने अनमोड घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर महाराष्ट्र पोलिसांनी आंबोली घाटातील कांही भाग नाजूक धोकादायक बनला असल्यामुळे या घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. परिणामी गोव्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना आता सर्वसामान्य अंतरापेक्षा कारवार मार्गे आणखी 80 कि. मी. ज्यादा अंतराचा प्रवास करून जावे लागणार आहे.
गोव्याकडे जाणाऱ्या एनएच -748 महामार्गावरील साखळी येथे चोर्ला घाटाच्या शेवटापर्यंत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे.
यासाठी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे 4 ते 11 मे 2022 या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंदी असणार असून वाहतूक मनमाड मार्गे वळविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे अनमोड घाट देखील अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.