सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमास शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह मराठा समाजाच्या अन्य दोन पूज्य स्वामीजींचे सानिध्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे.
सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात प्रामुख्याने जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा सत्कार केला जाणार आहे. सदर कार्यक्रमांला पूज्य श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्यासह परमार्थ साधक संघ काशीचे वेदांतचार्य स्वामी सोहम चैतन्य पुरी आणि नूल (ता. गडहिंग्लज) येथील रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती राष्ट्रीय धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराज यांचे सान्निध्य लाभणार आहे.
त्याप्रमाणे बेळगावातील मराठा समाज बांधवांसाठी अभिमानाची बाब ही म्हणजे शिवरायांचे वंशज कोल्हापूरचे श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गुरुवंदना कार्यक्रमामध्ये पूज्य श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्यासह स्वामी सोहम चैतन्य पुरी व श्री भगवानगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा लाभ देखील बेळगावकरांना मिळणार आहे.
मराठा समाजाच्या तीन महास्वामीजींचे मार्गदर्शन लाभण्याचा बेळगावकरांसाठी हा दुर्मिळ योग असून त्याचा सर्वांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त त्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 9 वाजता शहरात भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे.
शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथून पारंपारिक मराठा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. वडगाव येथील आदर्श विद्या मंदिर प्रांगणात या शोभायात्रेची सांगता होऊन त्यानंतर मुख्य गुरुवंदना कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.