मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरवणे, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो.
त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून ‘गुलमोहर डे’ साजरा करण्याची पद्धत आहे.
दरवर्षी 1 मे रोजी ‘गुलमोहर डे’ वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चित्रकार गुलमोहराची चित्रे रेखाटतात, कवी गुलमोहरावर कविता करतात, फोटोग्राफर कॅमेऱ्यांत बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोंचे प्रदर्शन भरवितात.
गुलमोहराचे शास्त्रीय नांव डिलॉनिक्स रेजिया असे असून हा उष्ण तथा समशीतोष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. गुलमोहराच्या झाडाचे इंग्रजी नांव ‘मे फ्लॉवर ट्री’ असे आहे.
गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो हे विशेष होय. फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहरावर चपट्या फूट दीड फूट लांब आणि दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात.
कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहराची झाडे अंकुरतात आणि कालांतराने मोठी होऊन दरवर्षी रणरणत्या उन्हाळ्यामध्ये निसर्गाच्या सौंदर्यात नेत्रसुखद भर घालण्याचे आपले कर्तव्य पार पाडत असतात. बेळगाव शहर परिसरात प्रामुख्याने कॅम्प येथील बहुतांश प्रमुख मार्ग, किल्ला परिसर, टिळकवाडी आदी परिसरात गुलमोहोराची झाडे मोठ्या प्रमाणात आहे.
मे महिना सुरू असल्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून हे गुलमोहोर फुलांनी बहरलेले दिसत आहे. त्यामुळे दररोज या झाडांच्या परिसरात तसेच रस्त्यावर गुलमोहोराच्या फुलांचा गालिचा पसरलेला पहावयास मिळतो.