पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मागणी वाढल्यामुळे सरकारने या शैक्षणिक वर्षात (2022 -23) राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील वर्ग शिफ्ट पद्धतीनुसार दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी बेंगलोर येथे ही माहिती दिली. राज्यातील ज्या शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये जास्त विद्यार्थी असतील तेथे आम्ही शिफ्टच्या आधारावर वर्ग आयोजित करू. उदाहरणार्थ कला आणि विज्ञानाचे वर्ग सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुपारी वाणिज्यचे वर्ग असतील. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता नाही.
आम्ही आमच्याकडे असलेल्या पायाभूत सुविधांसह गर्दीचे व्यवस्थापन करू शकू, परंतु वर्गखोल्यामधील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही दोन शिफ्टमध्ये वर्ग चालविण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यास सांगण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे अ, ब, क असे गट करून त्यांचे दोन सत्रात वर्ग घेतले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेळ ठरवून दिली जाणार आहे.
राज्यात 1,203 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय आणि 3,301 खाजगी विनाअनुदानित तर 697 खाजगी अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्याने उच्चशिक्षण विभागाने गेल्यावर्षी शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शिफ्ट पद्धतीने वर्ग आयोजित केले होते.