बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असणारा पाऊस आणि काल गुरुवारी झालेली 100 मि. मी. पावसाची नोंद या पार्श्वभूमीवर जिल्हापालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी आपल्या स्वाक्षरीने अधिकृत पत्राद्वारे बेळगावच्या जिल्हाधिकार्यांना उपरोक्त सल्ला दिला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काल गुरुवारी पर्जन्यमापन केंद्रामध्ये 100 मि. मी. म्हणजे 10 सें. मी. पावसाची नोंद झाली आहे. येत्या या तीन-चार दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पावसामुळे जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती सिद्धता करावी.
मदत कार्य आणि आपत्ती निवारणासंदर्भातील क्रम तात्काळ हाती घेता यावेत यादृष्टीने सज्ज रहावे. नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्याचे निवारण करण्याच्या दृष्टीने 24 तास प्रशासकीय यंत्रणा सजग राहणे अत्यावश्यक आहे. येत्या तीन-चार दिवसात पावसाचा जोर वाढवून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तेंव्हा पूर परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते क्रम घेतले जावेत.
मदत कार्य तसेच अन्य अत्यावश्यक सेवा सज्ज ठेवल्या जाव्यात. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हाधिकार्यांना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.