शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले असून सकल मराठा समाजातर्फे या चित्ररथ मिरवणूकीतील देखाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी मोफत मेकअप करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
शिवजयंतीनिमित्त उद्या बुधवार दि. 4 मे 2022 रोजी सायंकाळी बेळगाव शहर आणि शहापूर भागातील भव्य चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आहे. त्याचप्रमाणे आज मंगळवारी रात्री वडगाव येथील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.
या चित्ररथ मिरवणूकीत शिवचरित्र देखावा सादर करणाऱ्या युवक -युवती, बालगोपाळ कलाकारांचा मेकअप मोफत करून देण्याचा उपक्रम शहरातील सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात येत आहे. वडगाव येथील अनुसया मंगल कार्यालय आणि अमर एम्पायर गोवावेस सर्कल शहापूर येथे सदर मोफत मेकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आज सकाळपासून कार्यकर्त्यांची मेकअप करून घेण्यासाठी अनुसया मंगल कार्यालय आणि अमर एम्पायर गोवावेस सर्कल येथे गर्दी होत आहे.
तेंव्हा शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत देखावा सादर करणाऱ्या कलाकारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे रमाकांत कोंडुसकर यांनी आहे.