बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे.
बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे गेल्या 14 आणि 15 मे रोजी पहिल्या पॅन इंडिया नॅशनल मास्टर्स गेम्स -2022 या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावच्या कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठ कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी चमकदार कामगिरी नोंदविली.
ज्योती यांनी 200 मी. फ्रीस्टाइल, 400 मी. फ्रीस्टाइल, 50 मी. बॅकस्ट्रोक आणि 4×50 मी. मिडले रिले या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक हस्तगत करण्याबरोबरच 4×50 मी. मिक्सड् रिले शर्यतीत कांस्य पदक मिळविले आहे.
अलिकडेच कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती होसट्टी यांनी देशाचे नांव उज्ज्वल केले होते. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योती यांनी या स्पर्धेतील 7 जलतरण प्रकारात 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक हस्तगत केले होते.
आता पहिल्या पॅन इंडिया नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जलतरणपटू ज्योती होसट्टी या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडूलकर यांचे मार्गदर्शन तसेच डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, लता कित्तूर, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.