* बेळगाव कोरोना मध्ये पितृछत्र हरवलेल्या अंकिता व अनिकेत या दोन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून जायंट्स ग्रुप बेळगाव (मेन) च्या वतीने त्या दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यांचे वडील दीपक देशपांडे यांचे 2021 मध्ये तामिळनाडू येथे कोरोनाने निधन झाले. ही दोन्ही मुले आता येथे आई समवेत राहतात.
जायंट्सचे डायरेक्टर धीरेंद्र मरलीहळी यांच्या सहकार्याने दोन विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. भरतेश शिक्षण संस्थेच्या भरतेश सेंट्रल स्कूल ,बसवन कुडची येथे ही भावंडे शिक्षण घेणार असून त्यांचा शिक्षणाचा खर्च देण्याचा निर्णय श्री मरलीहळी यांनी घेतला.
भरतेश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्रीपाल खेमलापुरे, संचालक विनोद दोड़न्नवर, प्राचार्य इंदिरा पाटील आणि सेंट्रल स्कूलच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन शरद पाटील यांनी जायंट्सने केलेली विनंती मान्य केल्यामुळे हे शक्य झाले. संस्थेने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
गुरुवारी सकाळी जायन्ट्स मेन चे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, कर्नाटक युनिट 6 चे डायरेक्टर अनंत लाड ,धीरेंद्र मरलीहळी व पद्मप्रसाद हुली यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी त्या विद्यार्थ्यांच्या मातोश्री श्रीमती मयुरी देशपांडे याही उपस्थित होत्या याप्रसंगी बोलताना अध्यक्ष श्री हिरेमठ यांनी जायन्ट्सच्या कार्याचा आढावा घेऊन भरतेश शिक्षण संस्थेचे आभार मानले. भरतेश शिक्षण संस्थेने अशा पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी यापूर्वीच घेऊन त्यांचे शिक्षण व राहण्याची व्यवस्था हलगा सेंट्रल स्कूलमध्ये केली असल्याची माहिती यावेळी अनंत लाड यांनी बोलताना दिली.