बेळगाव शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिवप्रेमींवर कोणताही दबाव न घालता उत्साहाने शांततेत पार पाडण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करून परिश्रम घेतल्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे पोलीस प्रशासन विशेष करून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयामध्ये बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी दीपक दळवी यांनी दोन वर्षाच्या खंडानंतर झालेली शहरातील पारंपारिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिवप्रेमींवर कोणताही दबाव न घालता उत्साहाने शांततेत पार पडली.
याला पोलीस प्रशासनाने गेल्या काही दिवसात जी तयारी केली जे मायक्रो प्लॅनिंग ते कारणीभूत असल्याबद्दल, तसेच पोलीस प्रशासनाने बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाने दिलेल्या सूचनांना बगल न देता त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि अभिनंदन केले.
पोलीस आयुक्तांच्या भेटीप्रसंगी दळवी यांच्यासमवेत बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष महेश जुवेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण -पाटील आदी उपस्थित होते.