कौटुंबिक कलहातून अनगोळ तेथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अनगोळ शिवारामध्ये आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
महावीर चिंनाप्पा सुप्पणावर (वय 60, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
अलीकडे सुप्पणावर कुटुंबीयांमध्ये भांडणे सुरू होती. यात भर म्हणून हलगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी महावीर याच्या शेतजमिनीचा कांही भाग भू -संपादित करण्यात आला आहे. या सर्वामुळे त्याने मनस्ताप होऊन आत्महत्या केली असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
अनगोळ शिवारामध्ये आज शुक्रवारी सकाळी शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना महावीर सुप्पणावर याचा मृतदेह त्याच्या शेतातील झाडाला लोंबकळताना आढळला. सदर आत्महत्येच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
तसेच मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाडला. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.