बेळगाव जिल्ह्यासह शहराचा यंदाचा दहावीचा निकाल उत्तम लागला असला तरी या परीक्षेत सर्वाधिक अनुत्तीर्ण विद्यार्थी हे दुर्देवाने बेळगाव शहरातीलच आहेत. शहरातील तब्बल 1,714 विद्यार्थी यंदा नापास झाले आहेत.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेस बेळगाव शहरातील 8,556 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,742 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 1,714 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रथमच दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले आहेत. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. बहुतांश विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता. पुरवणी परीक्षेची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अनुत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांना येत्या 30 मे पर्यंत पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. याची नोंद घेऊन संबंधित विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शिक्षण खात्यातर्फे करण्यात आले आहे.