येळ्ळूर -वडगाव मुख्य रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्यात टँकरने आणलेले शहरातील ड्रेनेजचे मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा संतापजनक प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा प्रकार त्वरित थांबवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून येळ्ळूर -वडगाव मुख्य रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्यात टँकरने आणलेले शहरातील ड्रेनेजचे मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे नाल्यातील पाणी दूषित होण्याबरोबरच येळ्ळूर -वडगाव रस्त्यावर अत्यंत दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. परिणामी या रस्त्यावरून ये -जा करणे नागरिकांना दिवसेंदिवस असह्य होऊ लागले आहे. दुर्गंधीमुळे दुचाकी वाहनचालकांसह विशेष करून पादचाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
बेळ्ळारी नाल्यामध्ये ड्रेनेजचे मैलायुक्त सांडपाणी सोडण्याच्या या प्रकाराला यापूर्वी वेळोवेळी आक्षेप घेण्यात आला आहे. तथापि अद्यापही हा संतापजनक प्रकार सुरूच आहे. आज शुक्रवारी देखील एक टँकर बेळ्ळारी नाल्यात मैलायुक्त सांडपाणी रिते करण्यासाठी आला होता. मात्र त्याला अडवून येळ्ळूरचे माजी ग्रा. पं. सदस्य सतीश कुगजी यांनी जाब विचारला. तेंव्हा टँकरवरील कर्मचाऱ्यांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या आदेशावरून आम्ही काम करत आहोत. तुम्हाला जाब विचारायचा असेल तर अधिकारी व कंत्राटदाराला विचारा असे सांगितले. त्यावेळी संतप्त कुगजी यांनी आक्रमक पवित्रा घेताना त्यांना बेळ्ळारी नाल्यात मैल्याचे सांडपाणी सोडण्यास मज्जाव केला.
तसेच यापुढे या रस्त्यावर पुन्हा तुमची गाडी दिसता कामा नये, अशी तंबी देऊन सतीश कुगजी यांनी त्या टँकरला आल्या वाटेने माघारी धाडले. बेळ्ळारी नाल्यात या पद्धतीने मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून प्रसंगी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले जाईल.
मात्र तत्पूर्वी नाल्यामध्ये मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा यासाठी लवकरच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले जाईल, अशी माहिती सतीश कुगजी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.