आपल्या मतदार संघातील मूलभूत नागरी समस्या सोडविण्याबरोबरच विकास कामे राबविण्याच्या उद्देशाने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी काल शिवनगर कणबर्गी येथील नागरिकांची बैठक घेतली.
यंदाच्या वर्षी शहरातील सर्व विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपाय योजना राबवत आहेत. तसेच आपल्या मतदार संघात पाहणी दौरा करून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
त्या अनुषंगाने काल मंगळवारी त्यांनी शिवनगर कणबर्गी येथील नागरिकांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आपल्या भागात नागरिकांना कोणत्या नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच कोणत्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. याबाबत आमदारांनी उपस्थित नागरिकांशी चर्चा केली.
सदर चर्चेअंती आवश्यक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, पथदीप बसविणे, गटारी आणि सीडीवर्कचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे आश्वासन आमदार ॲड. बेनके यांनी दिले. याप्रसंगी बसवराज येळ्ळूरकर, मोहन मुतगेकर, अमोल मन्नोळकर, महेश सदावार, राकेश मन्नोळकर कृष्णा सदावार, रवी, प्रभाकर मन्नोळकर आदींसह बेलगिरी व शिवनगर कणबर्गी येथील स्त्री-पुरुष रहिवासी उपस्थित होते.