पूर, नैसर्गिक आपत्ती, कोविडची चौथी लाट या सर्व शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावचे डीसी अर्थात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आपल्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकारच्या सभेचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. पूरपरिस्थिती, कोविडची चौथी लाट हे सर्व लक्षात घेऊन कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्यासाठीच्या सर्व उपाययोजना आपण लागू केल्या पाहिजेत. तहसीलदारांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या तालुक्यातील नदीतीरावर असणाऱ्या पिकाच्या दृष्टीने पंचायत अभिवृत्ति अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा सहभागी घेऊन उपाययोजनांची आखणी करावी, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
नदीतीरावर असणार्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी बोटीची व्यवस्था करावी. जेथे बोटीची उपलब्धता नाही त्याची माहिती दिल्यास बोट व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी, आरोग्य विभाग, पोलिस, गृहरक्षक या विभागासह सर्व खात्यांचे समन्वयक या अधिकार्यांशी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली.
सद्यपरिस्थितीत आपत्तीत असलेल्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी कंट्रोल रुमची स्थापना करणे आवश्यक असून त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी काम सुरु करावे. आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास कंट्रोल रूम त्वरित कार्यान्वित करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा. म्हणजे वेळेवर मदत पोहोचता येईल. तसेच वैद्यकीय पथकांची नेमणूक करावी.
साप किंवा तत्सम विषारी प्राण्यांचा दंश झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या औषधांची व्यवस्था करून ठेवावी. विद्युत पुरवठा सुरळीत रहावा यासाठी दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील जल विभाग अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवावा. महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण आणि कोयना नदीतील पाण्याची पातळी याची माहिती वेळोवेळी घेतली जावी. यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी बैठक करावी. दुर्दैवाने मनुष्यहानी किंवा प्राण्यांची प्राणीहानी झाल्यास त्या कुटुंबीयांना त्वरित मदत निधी मिळण्यास विलंब होणार नाही याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष वेधले
. प्रत्येक तालुक्यामध्ये काळजीवाहू केंद्रांची स्थापना करावी असे अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस वरिष्ठ अधिकारी नंदगावी तसेच अन्य विभागाचे अधिकारी, तहसीलदार, ता. पं. कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते.