नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाची खडी -माती पडून बुजलेल्या भांदूर गल्ली व पाटील मळा पाठीमागील रेल्वे मार्गाशेजारील मोठ्या गटारीची साफसफाई आज दुपारनंतर रेल्वे खात्याकडून करण्यात आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहराच्या प्रभाग क्र. 10 मधील भांदूर गल्ली आणि पाटील मळ्याच्या मागील बाजूस नाल्यांच्या बाजूने रेल्वेमार्ग शेजारी असलेले मोठे गटार सध्या सुरू असलेल्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामाची खडी व माती पडून पूर्णपणे बुजले होते. त्यामुळे या गटारामार्गे सांडपाण्याचा निचरा होणे बंद होऊन सांडपाणी पाटील मळा व भांदुर गल्ली येथील घरांच्या मागील बाजूच्या भंगीबोळ पॅसेजमधील दोन्ही बाजूच्या गटारी तुंबून एकत्र ओव्हरफ्लो होत होत्या. भरवस्तीत या पद्धतीने गटारी तुंबून दुर्गंधीयुक्त अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होण्याबरोबरच आरोग्यास धोका निर्माण झाला होता.
यासंदर्भातील तक्रारीची दखल घेऊन प्रभागाच्या नगरसेविका वैशाली भातकांडे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून रेल्वे मार्ग शेजारील मोठ्या गटारीतील खडी व माती काढण्यात यावी यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या पाठपुराव्याला आज यश आले.
आज शनिवारी दुपारनंतर नगरसेविका वैशाली भातकांडे व सिद्धार्थ भातकांडे यांनी रेल्वे अधिकार्यांसमवेत स्वतः जातीने उपस्थित राहून खडी -माती पडून बुजलेल्या संबंधित गटारांची साफसफाई करून घेतली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या रेल्वे गेट येथे दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना गटारीच्या सफाईकडे लक्ष देण्यास विलंब झाल्याचे भातकांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान नाल्या शेजारील बुजलेल्या मोठ्या गटारीच्या साफसफाईमुळे भांदूर गल्ली व पाटील मळा येथील तुंबलेल्या गटारींची समस्या दूर होणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.