हालगा -मच्छे बायपाससाठी शेतजमीन गमावण्याबरोबर अलीकडे घर कोसळल्यामुळे महावीर सुपण्णवर यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातून घरात कलह निर्माण झाल्याने त्याने आत्महत्या केली. या पद्धतीने बायपास रस्ता देखील सुपण्णवर याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
रघुनाथ पेठ, अनगोळ येथील महावीर जिन्नाप्पा सुपण्णवर या वयस्क शेतकऱ्याने अनगोळ शिवारातील आपल्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महावीर हा गरीब छोटा शेतकरी होता. हलगा -मच्छे बायपास रस्त्याला लागूनच सर्व्हे नं. 431 मध्ये त्यांची शेत जमीन आहे.
बायपास रस्त्यासाठी महावीर याच्या शेतजमिनीचा 100 चौ. मी. इतका हिस्सा भू- संपादित करण्यात आला असे म्हंटले जात असले तरी प्रत्यक्षात 280 चौ. मी. जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे महावीर सुपण्णवर याचाही आपली शेत जमीन बायपाससाठी देण्यास विरोध होता. त्यामुळे त्याने सरकारकडून देऊ करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम देखील नाकारली होती.
अलीकडे शेतातून फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे महावीर आर्थिक स्थिती बेताची झाली होती. बायपास रस्त्यामध्ये शेत जमिनीचा हिस्सा जाण्याबरोबरच कांही दिवसांपूर्वी त्याचे घर देखील कोसळले होते. परिणामी घरची आर्थिक परिस्थिती अधिकच नाजूक होऊन सुपण्णवर कुटुंबात वरचेवर कलहाचे प्रसंग घडत होते. त्याचा अतिरेक झाल्यामुळे खचलेल्या महावीर सुपण्णवर याने नैराश्येच्या भरात गळफास लावून आपले जीवन संपविले.
यावरून महावीर याच्या मृत्यूस या ना त्या प्रकारे बायपास रस्त्यासाठीचे भूसंपादन देखील तितकेच कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच यातून शहाणे होऊन सरकारने गरीब शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी बेकायदेशीररीत्या सुरु असलेले बायपास रस्त्याचे काम तात्काळ रद्द करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.