वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी 1 जून नंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी बसपासचे वितरण केले जाते. मात्र यंदा शाळा 16 मेपासून सुरू झाल्यामुळे येत्या सोमवार दि. 23 मे पासूनच बसपास प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
बेळगाव परिवहन विभागात शहर व ग्रामीण आगारासह बैलहोंगल, खानापूर आणि रामदुर्ग आगारांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणचे मिळून दरवर्षी 76 हजार विद्यार्थ्यांना बसपास दिले जातात.
शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात हे पास वितरित केले जातात. मात्र यंदा 15 दिवस आधीच शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी बसपास अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येत आहे. दरम्यान सध्या विद्यार्थ्यांकडे असलेल्या बसपाची मुदत 30 जूनपर्यंत असणार आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना प्रथम सेवा सिंधू संकेतस्थळावर बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आपल्या नजीकच्या ग्राम वन किंवा सीएससी केंद्रातून ही अर्ज करता येतील.
अर्ज केल्यानंतर तेथून एक सांकेतिक क्रमांक पोचपावती म्हणून दिला जाईल. या सांकेतिक क्रमांकासह विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून लेखी अर्ज द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित शाळातून अर्ज एकत्रितरित्या परिवहन महामंडळाकडे पाठवले जातील. त्यानुसार बसपास वितरण केले जाणार आहे.