छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकोट किल्ल्यांची इत्यंभूत माहिती आणि इतिहास जाणणारे बेळगावचे कट्टर शिवभक्त राजू शेट्टी यांनी आज महाराजांची सेवा करत असताना अखेरचा श्वास घेतला. किल्ले रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पायी जात असताना महाराष्ट्रातील महाडनजीक राजू शेट्टी (वय 63 वर्षे) यांचे आज सोमवारी आकस्मिक निधन झाले.
राजू शेट्टी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, विवाहित मुलगा विनायक आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवरायांचे पाईक असणारे राजू शेट्टी हे बेळगाव शहरामध्ये कट्टर शिवभक्त म्हणून प्रसिद्ध होते.
एकेकाळी गडकोट किल्ले भ्रमंतीमध्ये सीमाभागासह महाराष्ट्रात नांव कमावलेल्या बेळगावच्या सह्याद्री हायकर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी शिवसेना उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आप्पाजी गवंडी, नरसिंग कळसापुर व किशोर राक्षे या धाडसी शिवभक्तांच्या तुकडीने 1988 साली बेळगावातून सर्वप्रथम रायगड, प्रतापगड आदी महाराष्ट्रातील शिवकालीन गड किल्ल्यांची सायकलवरून भ्रमंती केली होती. त्यानंतर शेट्टी यांनी बेळगावातील शिवकालीन गड-किल्ल्यांची भ्रमंती मोहिमा आखून त्या यशस्वी करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
स्वतःच्या नेतृत्वाखालील या मोहिमांद्वारे शेट्टी यांनी बेळगावातील मुला-मुलींना धाडसी बनवण्याबरोबरच त्यांना शिवकालीन इतिहास आणि छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम याची नव्याने ओळख करून दिली. छ. शिवाजी महाराज आणि शिवकालीन गडकोट किल्ले यांचे अभ्यासक म्हणून राजू शेट्टी सुपरिचित होते.
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले आणि गड यांची त्यांना इत्यंभूत माहिती होती. याखेरीज शहरातील ऐतिहासिक शिवजयंती उत्सव आणि मिरवणुक आयोजनांमध्ये देखील शेट्टी नेहमी आघाडीवर असत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला पायी जात असताना म्हणजे राजांची एक प्रकारे सेवा करत असताना गडकोट किल्ल्यांचे अभ्यासक राजू शेट्टी यांचे आज महाडनजीक आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र विशेषकरून शिवभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.