बेळगाव शहरातील शाहूनगर लास्ट बसस्टॉप या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भितीदायक करणीचे साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी चर्चेचा विषय झाला होता.
शाहूनगर लास्ट बसस्टॉप येथे दुपदरी रस्ता ज्या ठिकाणी खंडित होतो त्या चौकवजा खुल्या रस्त्याच्या मधोमध कोणीतरी करणीचे साहित्य ठेवल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला.
मोठ्या काळ्या कपड्यावर शेंगदाणे, खारा, हरभरे, चिरमुरे यांचा ढीग पसरवून त्याच्या बाजूने कोहाळ, नारळ, लिंबू त्यावर उधळलेला हळद-कुंकू अशा स्वरूपातील हा करणीचा प्रकार प्रथम दर्शनी ऊरात धडकी निर्माण करत होता. या ठिकाणी शेजारीच बसस्टॉप असून करणीच्या प्रकारामुळे तेथे बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची आज गैरसोय झाली.
महिलावर्गात समोरच रस्त्यावरील तो करणीचा प्रकार पाहून भीती व्यक्त होताना दिसत होती. सदर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालक देखील करणीचे ‘ते’ साहित्य टाळून आपली वाहने हाकताना दिसत होते.
दरम्यान करणीचा हा प्रकार पाहून जग अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना आपल्या समाजात अद्यापही भानामती, करणी आदी सारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला जात असल्याबद्दल आधुनिक विचारसरणीच्या मंडळींमध्ये मात्र खेद व्यक्त होत होता.