बेळगावातून आता अहमदाबाद आणि भुजला थेट जाता येणार असून स्टार एअरकडून बेळगाव ते भुज अशी विमानसेवा येत्या शुक्रवार दि. 3 जून 2022 पासून सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे.
गुजरातमधील भुज हे शहर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. भारत-पाक युद्धाशी संबंधित एक चित्रपटही या शहराच्या नावावरून नुकताच प्रदर्शित झाला होता. कच्छच्या वाळवंटात हे शहर वसलेले असून येथील हस्तकला प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक दृष्ट्या देखील भुज शहर नावाजलेले आहे. त्यामुळे स्टार एअरने बेळगाव येथून या शहरासाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारपासून आठवड्यातील पाच दिवस ही नॉनस्टॉप सेवा उपलब्ध असणार आहे.
बेळगावातून अहमदाबाद मार्गे भुज ही लिंक सेवा असणार आहे. दर सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी बेळगाव -भूज विमानसेवा सुरू राहील. स्टार एअरचे विमान बेळगाव येथून दर सोमवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9:10 वाजता प्रस्थान करेल आणि दुपारी 12 वाजता भुजला पोहोचेल. त्याप्रमाणे दुपारी 12:30 वाजता भूज येथून उड्डान करून दुपारी 3:30 वाजता बेळगावला पोहोचेल. याव्यतिरिक्त दर बुधवारी बेळगाव येथून 2:15 वाजता प्रस्थान करणारे विमान सायंकाळी 5:10 वाजता भुजला पोहोचेल. परतीच्या प्रवासात भूज येथून सायंकाळी 5:35 वाजता निघणारे विमान रात्री 8:30 वाजता बेळगावला पोहोचेल.
सध्या बेळगाव विमानतळावरून स्पाईस जेट ,स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स एअर आदी विमान कंपन्यांकडून विमान सेवा दिली जात आहे. बेळगाव विमानतळावरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून बंगळूर आणि मंगळूर पाठोपाठ हे विमानतळ राज्यात तिसरा क्रमांकावर आहे. दरम्यान नव्या भुज सेवेबद्दल बोलताना बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी आठवड्यातून पाच दिवस बेळगावहून अहमदाबाद मार्गे भुज विमानसेवा दिली जाणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे सांगून स्टार एअरकडून आठ शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. लवकरच अन्य कांही मार्गांवरील विमान सेवा बेळगाव विमानतळावरून सुरू होणार असल्याचे सांगितले.