बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावचा युवा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने तीन रौप्य पदकांसह एकूण 5 पदके पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
2 ऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक अंतर्गत बेंगलोरच्या बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर येथे पार पडलेल्या जलतरण स्पर्धांमध्ये बेळगावच्या अमन सुणगार याने 50 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक आणि 100 मी. बॅकस्ट्रोक या प्रकारात रौप्यपदक, तर 200 मी. बॅकस्ट्रोक व 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले प्रकारात कांस्य पदक मिळविले.
कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे आयोजित मिनी ऑलिंपिकमधील जलतरण स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातील सुमारे 700 जलतरणपटुंनी भाग घेतला होता.
अमन सुणगार हा शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात जलतरणाचा सराव करतो. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, नितीश कुडूचकर, अजिंक्य मेंडके व गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्याचप्रमाणे डॉ. प्रभाकरराव कोरे, डॉ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, श्रीमती माकी कपाडिया, लता कित्तूर आणि सुधीर कुसाणे यांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अमन सुणगार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.