बेळगाव उपनोंदणी कार्यालयात एजंटचा वाढदिवस साजरा करण्याच्या घटनेची जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून उपनोंदणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 24 तासात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याचा इशाराही दिला आहे.
शहरातील उपनोंदणी कार्यालयात एका एजंटचा वाढदिवस साजरा केल्याचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला तसेच वृत्तपत्रातही बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे उपनोंदणी कार्यालयातील एजंटगिरी चव्हाट्यावर आली होती. वाढदिवसाच्या या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांशी असलेले एजंटांचे सख्खे उघड झाले आहे.
तेंव्हा यातून भ्रष्टाचार वाढत नसेल कशावरून? असा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे दाखले देत नोंदणी अधिकारी रवींद्र हंचिनाळ यांना नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपनोंदणी कार्यालयात थेट जाणाऱ्या व्यक्तींचे काम होत नाही. एजंटाद्वारे गेल्यास कांही तासात कामे केली जातात अशी तक्रार आहे. पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयातील अधिकार्यांच्या दालनात एजंटाचा वाढदिवस बेधडकपणे साजरा केला ही बाब संतापजनक आहे. दुसरीकडे या संदर्भात बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना दूरध्वनीद्वारे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळाल्याचे समजते.
या सर्व प्रकारामुळे कर्नाटक सरकार नागरी सेवा संहितेचे उल्लंघन होत आहे. यासाठी 24 तासात याबाबतचा तपशील सादर करावा, अन्यथा शिस्तभंग कारवाईसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल, अशी नोटीस जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी बजावली आहे.