कोरोनामुळे पालक गमावल्याने अनाथ झालेल्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार असून पंतप्रधान सहाय्यता निधीतून यासाठीचा खर्च केला जाईल.
देशभरात ज्या मुलांचे पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना केंद्रीय विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश दिला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालय संघटनेला केली आहे. त्यामुळे जरी केंद्रीय विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया संपलेली असली तरीही अतिरिक्त जागा उपलब्ध करून देऊन या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. या विद्यार्थ्यांना विमा संरक्षणासह त्यांच्या संपूर्ण विकासावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील भर देण्यात आला आहे.
यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर फाॅर चिल्ड्रन स्कीम’ अंतर्गत या मुलांना शैक्षणिक प्रवेश दिला जावा अशी सूचना केंद्रीय विद्यालय संघटनेला केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यांच्याकडून दहा मुलांच्या नावांची शिफारस केंद्रीय विद्यालय प्रवेशासाठी केली जाऊ शकते. या विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे.