येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त येत्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानातील लोकमान्य केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पंजाब केसरी पंजाबचा पै. प्रीतपाल फगवाडा आणि भारत केसरी हिंद केसरी पै. भूपेंद्र अजनाला यांच्यात होणार आहे.
येळ्ळूर येथील ऐतिहासिक महाराष्ट्र मैदानामध्ये होणाऱ्या या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी सोलापूरचा पै. सिकंदर शेख आणि दिल्ली केसरी दिल्ली गुरुबद्री आखाड्याचा पै. रोहित चौधरी यांच्यात होईल. त्याचप्रमाणे पहिल्या प्रमुख पाच कुस्त्यांपैकी तीन, चार व पाच क्रमांकांच्या कुस्त्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे असतील.
महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे विरुद्ध रेल्वे आखाडा हरियाणाचा पै. संतु गुज्जर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. शुभ पाटील विरुद्ध हिमाचल चॅम्पियन पै. सकमन अजनाला आणि दावणगिरीचा डब्बल कर्नाटक केसरी पै. कार्तिक काटे विरुद्ध पंजाबचा पै. विकास खन्ना. याव्यतिरिक्त या कुस्ती मैदानात लहान-मोठ्या 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत.
सदर बेमुदत निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, कोल्हापूरचे छ. मालोजीराजे भोसले, मल्लविद्या आश्रयदाते सतीश पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कुस्ती शौकिनांनी या कुस्ती मैदानाची मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन येळ्ळूर कुस्ती आखाडा समिती, महाराष्ट्र कुस्ती मैदान येळ्ळूरच्या अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.