आज झालेल्या वादळी पावसामुळे झाड अंगावर कोसळून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील क्लब रोड येथे घडली.
विजय कोल्हापुरे (रा. काळी अमराई) असे मयत दुचाकीस्वाराचे नांव आहे. आज सायंकाळी वादळी पावसाला सुरुवात झाली त्यावेळी विजय कोल्हापुरे हा दुचाकीवरून क्लब रोड मार्गे आपल्या घराकडे निघाला होता. त्याने हेल्मेट देखील परिधान केले होते.
पावसाचा जोर वाढल्याने तो रस्त्याकडेला झाडाखाली थांबला. त्यावेळी रस्त्या शेजारील ते झाड अचानक विजयच्या अंगावर कोसळले. कोसळलेले झाड प्रचंड मोठे असल्यामुळे विजयाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला.
विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू असताना एखाद्या झाडाखाली थांबणे किती धोकादायक असते याची प्रचिती आपल्याला उपरोक्त दुर्घटने वरून येऊ शकते.
तरी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना आसऱ्यासाठी कधीही झाडाखाली थांबणे टाळले पाहिजे असे जाणकारांचे मत आहे.