आत्महत्या करणारे कंत्राटदार संतोष पाटील यांच्याकडे अडकलेले रस्ते विकास कामांचे 4 कोटी रुपये शासन दरबारी प्रयत्न करून मिळवून द्यावेत, अशी मागणी पोटकंत्राटदारांनी आमदार रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या नेतृत्वाखाली 10 ते 12 पोट कंत्राटदारांनी जारकीहोळी यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच भेट घेतली.
दिवंगत कंत्राटदार संतोष पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष मन्नोळकर यांच्या उपस्थितीत यात्रेपूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी 4 कोटी रुपयांची रस्त्याची विकास कामे 12 जणांना विभागून दिली होती. ही कामे आता पूर्ण होऊन वर्ष होत आले असून अद्याप बिले मिळालेले नाहीत. पाटील यांनी आत्महत्या केल्याने बीले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
उधारी आणि व्याजाने पैसे काढून विकास कामे पूर्ण केली आहेत. आमचे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि 40 टक्के कमिशन व्यवहाराशी कोणतेही देणेघेणे नाही. आम्हाला फक्त आमचे पैसे हवे आहेत. त्यामुळे केलेल्या विकास कामाचे पैसे आम्हाला मिळवून द्यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी जारकीहोळी यांच्याकडे केली.
तेंव्हा कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. तथापि पैसे मिळवून देण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार रमेश जारकीहोळी यांनी कंत्राटदारांना दिले. याप्रसंगी अनिल करोशी, राजू जाधव व अन्य पोटकंत्राटदार उपस्थित होते.