कर्नाटक राज्यात अलीकडेच पार पडलेल्या एसएसएलसी अर्थात दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला आज शनिवारपासून प्रारंभ झाला असून बेळगावातील 8 केंद्रांवर ही पेपर तपासणी करण्यात येत आहे.
राज्यामध्ये गेल्या 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली. त्यानंतर दहावी परीक्षेचा निकाल लवकर लावण्याच्या दृष्टीने शिक्षण खात्याने पेपर तपासणीचे काम लवकर हाती घेण्याची तयारी केली होती. त्यानुसार राज्यातील 34 शैक्षणिक जिल्ह्यातील केंद्रासह बेळगाव शहरातील महिला विद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, सेंट झेवियर हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल आणि सरकारी हायस्कूल महांतेशनगर या ठिकाणी मूल्यमापनाचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे.
शहरातील सर्व केंद्रांवरील मूल्यमापन प्रमुखांना पेपर तपासणीचे काम कशाप्रकारे हाती घ्यावे याबाबत काल शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. शहरातील संबंधित 8 केंद्रांमध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून पेपर तपासणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या उत्तर पत्रिका शहरात तपासल्या जाणार आहेत. तसेच पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्याची सूचना करण्यात आली आहे सर्व पेपर तपासणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून पेपर तपासणीचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना मूल्यमापकांना करण्यात आली आहे. येत्या मे महिन्याच्या 12 तारखेला एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, मूल्यमापनाचे काम योग्य प्रकारे करण्याची सूचना करण्यात आली असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण खात्यातर्फे देण्यात आला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित शिक्षकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.