Saturday, November 16, 2024

/

बेळगाव आयुक्तालयाकडून विक्रमी जीएसटी संकलन

 belgaum

बेळगाव केंद्रीय वस्तू आणि सेवा कर जीएसटी आयुक्तालयाने यंदाच्या 2021 -22 आर्थिक वर्षात विक्रमी 10,172 कोटी रुपयांचा जीएसटी कर संकलीत केला आहे. देश कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून पुनश्च आर्थिक प्रगती साधत असल्याचे हे सुचिन्ह आहे, अशी माहिती जीएसटी मुख्यालयाचे उपायुक्त (प्रतिबंधात्मक) अजिंक्य हरी काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बेळगाव केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र प्रचंड असून तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, कोप्पळ, विजयनगर, बेळ्ळारी, रायचूर, यादगिरी, गुलबर्गा, बिदर, विजयपुरा आणि बागलकोट यासह एकूण 12 जिल्ह्यात ते पसरले आहे. विक्रमी जीएसटी कराचे संकलन हे या सर्व जिल्ह्यातील दोलायमान आणि मजबूत आर्थिक उलाढालीचे द्योतक आहे. त्याचप्रमाणे ते या भागातील लोकांचा उद्यमशील स्वभाव देखील अधोरेखित करते. या जिल्ह्यातील 2 लाख 30 हजार 566 कर दाते जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असून ते राज्य सरकार अथवा केंद्रीय जीएसटी प्राधिकरणाकडून प्रशासित केले जातात. बेळगाव केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून केंद्रीय जीएसटी अधिकारातील नोंदणीकृत करदात्यांकडून 10,172 कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे, असे काटकर यांनी पत्रकात म्हंटले आहे.

बेळगाव केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाचा 2019 -20 मधील महसूल 7,677 कोटी रुपये होता. हा महसूल 2020 -21 मध्ये 7,124 कोटी रुपये इतका झाला होता. मात्र यंदा 2021 -22 सालात आयुक्तालयाचा महसूल 10,172 कोटी रुपये इतका म्हणजे मागील वर्षाच्या कर संकलनाच्या तुलनेत 43 टक्क्यांनी जास्त आहे. स्टील, सिमेंट, खाण, साखर आदी जेएसडब्ल्यू स्टील, केशवराम इंडस्ट्रीज, ओरिएंट सिमेंट, एनएमडीसी सारखे मोठे उद्योग या आयुक्तालय कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त मोठ्या संख्येने असलेल्या व्यापाऱ्यांनी विक्रमी जीएसटी संकल्पनामध्ये मोठे योगदान दिले आहे.Cgst  bgm office

यंदाच्या आर्थिक वर्षात बेळगाव जीएसटी आयुक्तालयाने करदात्यांच्या अनुपालनासाठी विविध सुलभ पावले देखील उचलली आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांची विस्तृत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पद्धतीने विविध उपक्रम राबविण्याबरोबरच बेळगाव जीएसटी आयुक्तालयाने करचुकवेगिरीच्या विरोधात देखील उत्तम कामगिरी बजावली आहे. आयुक्तालयाने करचुकवेगिरी करून बेकायदेशीररीत्या नेण्यात येणारा सुमारे 7 कोटी रुपये किंमतीचा सुपारीचा साठा गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये जप्त केला.

जप्त केलेल्या या सुपारीचा लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात आली. यंदाच्या आर्थिक वर्षात आयुक्तालयाच्या अँटी इव्हॅशन विंगने एकूण 101 गुन्हे दाखल करून 3 कोटी रुपये रोख स्वरूपात आणि 503 कोटी रुपये आयटीसी स्वरूपात वसूल केले आहेत, अशी माहिती जीएसटी मुख्यालयाचे उपायुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी पत्रकात दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.