गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसाचा सर्वाधिक फटका हेस्कॉमला बसला असून अनेक ट्रान्सफॉर्मर निकामी होण्याबरोबरच वीज वाहिन्यांचे नुकसान व मोठ्या प्रमाणात वीज खांब कोसळल्यामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यात मिळून हेस्कॉमचे 1 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्याभरात झालेल्या वादळी पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात 418 वीज खांब कोसळून 41.80 लाख रुपये तर 39 ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यामुळे 58.50 लाख रुपयांचा फटका बसला आहे. बेळगाव तालुक्यात 5.92 कि. मी. तर खानापूर तालुक्यात 3.82 कि. मी. लांबीच्या वीज वाहनांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या वादळी पावसामुळे या दोन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी वीज खांब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक वीज खांब शिवारात पडल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे व फांद्या तुटून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले असून वीज खांब भुईसपाट होत आहेत.
दरवर्षी हेस्कॉमकडून पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र यावेळी अवकाळी पावसाने ही संधी हेस्कॉमला दिलीच नाही. त्यातच वाऱ्याचा जोर अधिक असल्याने हेस्कॉमला यावेळेस मोठा फटका बसला आहे. बेळगाव शहरात 34 व तालुक्यात 271 आणि खानापूर तालुक्यात 220 वीजखांब कोसळले आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यात 19 तर खानापूर तालुक्यात 20 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत.
दोन्ही तालुक्यात आत्तापर्यंत 17 खांब बदलण्यात आले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीकामामुळे सध्या अनेक गावांच्या शिवारातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या बुधवारी एकाच दिवशी खानापूर तालुक्यात तब्बल 53 वीजखांब वादळी पावसामुळे भुईसपाट झाले आहेत.