शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील एकत्रित सहयोग प्रस्थापित करून ते वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी युएसए अर्थात संयुक्त अमेरिकेतील फिलाडेफ्लीया येथील प्रतिष्ठित थॉमस जेफरसन विद्यापीठाने (टीजीयु) बेळगावच्या केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 मे रोजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी कोरे यांना हि पदवी बहाल केली जाणार आहे.
बेळगावच्या केएलई सोसायटीसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष आणि केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे (काहेर) चान्सलर डॉ. प्रभाकर कोरे यांना शिक्षण, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल टीजीयु विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे.
संयुक्त अमेरिकेतील अर्थात युएसएमधील थॉमस जेफरसन विद्यापीठ (टीजीयु) हे विद्यापीठ आघाडीच्या नामवंत विद्यापीठांपैकी एक आहे. डाॅ. प्रभाकर कोरे यांचे केएलई सोसायटी आणि काहेर यांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्त्वाचे योगदान आहे. बेळगाव सारख्या शहरामध्ये त्यांनी फक्त जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाच उपलब्ध करून दिला नाही तर दर्जेदार पारंपारिक आणि व्यावसायिक शिक्षणाचा भरवसा देखील दिला आहे. आज त्यांनी उभारलेल्या केएलई हॉस्पिटलमध्ये सर्व थरातील अगदी गोरगरीब जनतेसाठी देखील अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
दरम्यान, अमेरिकन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट मिळविणारे डॉ. कोरे हे पहिले भारतीय आहेत, अशी माहिती केएलई संशोधन केंद्राचे संचालक डॉ. शिवप्रसाद गौडर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गौडर म्हणाले, प्रभाकर कोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट बहाल करण्यात येणार आहे. 25 मे रोजी थॉमस जेफरसन विद्यापीठात हि पदवी बहाल करण्यात येणार असून त्याचवेळी थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या इंडिया सेंटरचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी थॉमस जेफरसन विद्यापीठाचे ग्लोबल अफेअर्सचे प्रमुख डॉ. रिचर्ड डर्मन बोलताना म्हणाले, प्रभाकर कोरे यांना हि पदवी केवळ ते कुलगुरू आहेत म्हणून देण्यात येत नसून त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल देण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, डॉ. कोटीवाले आदी उपस्थित होते.