फिश मार्केट कॅम्प येथे रस्त्याशेजारी तंबू ठोकून राहणाऱ्या एका असहाय्य गरीब कुटुंबाच्या मदतीला धावून जाताना फेसबुक फ्रेंड्स सर्कल, श्रीराम सेना हिंदुस्तान आणि समाजसेवक माजी महापौर विजय मोरे यांनी आज या कुटुंबातील निधन पावलेल्या एका व्यक्तीवर स्व-खर्चाने अंत्यसंस्कार केले.
कॅम्प फिश मार्केट परिसरात हे एक कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याकडेला उघड्यावर राहत आहे. या कुटुंबातील सुधाकर शट्टू लोखंडे (वय 47) याचे आज शनिवारी निधन झाले. मात्र हलाखीची परिस्थितीमुळे पैसे नसलेल्या लोखंडे कुटुंबियांसमोर मयत सुधाकर याच्यावर अंत्यसंस्कार कसे करावेत? असा प्रश्न पडला.
याबाबतची माहिती मिळताच फेसबुक फ्रेंड्स सर्कल, श्रीराम सेना हिंदुस्तान आणि समाजसेवक माजी महापौर विजय मोरे यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. तसेच मयत सुधाकर लोखंडे त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन स्वखर्चाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
याप्रसंगी शांताई वृद्धाश्रमाचे प्रमुख माजी महापौर विजय मोरे, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, वासिम बेपारी, हेमंत पाटील, प्रकाश कांबळे, अल्विस डिसोजा, मायकल स्टीव्हन, नरेश निलजकर, भारत नागराळी, संतोष पोटे सुशांत कुरणकर आदी उपस्थित होते.
कॅम्प फिश मार्केट परिसरातील सात्वती मंदिराच्या आवारात पंधरा सदस्यांचे एक कुटुंबीय चक्क 16 -17 वर्षापासून रस्त्याकडेला उघड्यावर राहत आहे गंगुबाई शट्टू लोखंडे ही साधारण पंच्याहत्तरी ओलांडलेली वृद्धा या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहे. एका वडाच्या झाडाच्या आश्रयाला 15 जणांचे हे कुटुंब तंबू ठोकून राहते अस्वच्छ वातावरणात राहणाऱ्या या कुटुंबाकडे आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नाही.
त्यामुळे मोठ्या कठीण परिस्थितीला तोंड देत त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो. परिसरातील मुस्लिम समाज बांधव या कुटुंबाला वेळोवेळी आपल्यापरीने मदत करत असतात. तरी लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाकडे लक्ष देऊन त्यांची कैफियत ऐकून त्यांना हक्काचा आसरा मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.